अटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते

0
936

नागपूर, दि. १७ (पीसीबी) – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी राजकीय क्षेत्रात जितके लोकप्रिय, तितक्याच्या त्यांच्या कविता लोकप्रिय झाल्या. केवळ कार्यकर्ते वा कवीच नव्हे तर, सर्वसामान्यांनादेखील त्यांच्या कवितांनी भुरळ घातली. असे हे कवी कुसुमाग्रजांचे निस्सिम चाहते होते. कुसुमाग्रजांच्या कविता त्यांना आवडायच्या. त्यातूनच वाजपेयींना अनुवाद करण्याची प्रेरणा मिळाली. चार-पाच कविता त्यांनी अनुवादित केल्याही. यातील ‘गर्जा जयजयकार’ही कविता त्यांनी अनेक कार्यकर्ते, रसिक व चाहत्यांना ऐकवली.

राज्य विधिमंडळ अधिवेशनकाळात गोवारी हत्याकांडानंतर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात वाजपेयी नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी धंतोलीतील पक्षाच्या विभागीय कार्यालयाला भेट देऊन स्थिती जाणून घेतली. त्यावेळी उपस्थित डॉ. उपेंद्र कोठेकर व संजय फांजे यांच्या काही वेळ निवांत गप्पा मारल्या. ‘रग रग हिंदू मेरा’ या कवितेचा मराठीत अनुवाद केल्याचे डॉ. कोठेकर यांनी वाजपेयी यांना सांगितले. यावर लगेच वाजपेयींनी कुसुमाग्रजांची अनुवादित केलेली कविता ऐकवली. कुसुमाग्रजांच्या दोन-तीन कविताही सादर केल्या. त्याचवेळी विनोद गुडधे त्यांना भेटावयास आले. यावर ‘काव्य पाठ चल रहा है, आप जरा रुकिए’, असे वाजपेयी यांनी गुडधे यांना सांगितले. कवितावाचन आटोपल्यावर त्यांनी गुडधे यांना कोणत्या विषयावर बोलायचे आहे, याबाबत विचारणा केली. पुरुष अत्याचार विरोधी विधेयकाबाबत भेटायवयास आलो असल्याचे गुडधे यांनी सांगितले. यावर वाजपेयी लगेच त्यांना थांबवून ‘मैने शादी नही की, अत्याचार पता नही’, असा विनोद केल्याचा किस्सा डॉ. कोठेकर यांनी सांगितला.