अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; भाजपचे सर्व कार्यक्रम रद्द

0
980

 नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – ‘एम्स’ रुग्णालयात उपचार घेत असलेले भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नसल्याने भाजपसह राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून देशभर प्रार्थना सुरू आहेत. भाजपने पक्ष पातळीवरील आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

वाजपेयी यांना बुधवारी रात्रीपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अशा सर्वच नेत्यांनी आज रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, वाजपेयींच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच, १७ व १८ ऑगस्टला होणारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही लांबणीवर टाकली  आहे. उत्तर प्रदेश व बिहार सरकारनेही आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.