अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस शिपाई गंभीर जखमी

0
249

निगडी, दि. १७ (पीसीबी) – निगडीकडून देहूरोडच्या दिशेने जात असलेल्या पोलीस शिपायाच्या मोपेड दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठमागून धडक दिली. त्यामध्ये पोलीस शिपाई गंभीर झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. १५) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथे सीओडी गेट क्रमांक तीन समोर जुना पुणे-मुंबई महामार्गावर घडली.

संजय भगवान भोसले (वय ४४, रा. सोमाटणे फाटा, ता. हवेली) असे जखमी पोलीस शिपायाचे नाव आहे. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई स्वप्नील साबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी संजय भोसले हे पुणे पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर मोटार परिवहन विभागात कार्यरत आहेत. ते मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास मोपेड दुचाकीवरून (एम एच १४ / एच व्ही ४३९८) पुण्याहून सोमाटणे येथील घरी जात होते.

जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात असताना भोसले देहूरोड येथील सीओडी गेट क्रमांक तीन समोर आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे भोसले यांची दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावरील इलेक्ट्रिक पोलला धडकली. त्यात त्यांच्या चेह-यावर, बरगडी आणि हाताला गंभीर दुखापत झाली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.