“अजित पवार लपवण्यासारखं काहीच करत नाहीत”

0
347

पुणे, दि. ७ (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार लपवण्यासारखं काहीच करत नाहीत. त्यामुळे काही लपवण्याचा प्रश्नच येत नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांनी कागदपत्रं दडवलीच नाही तर उघड करण्याचं प्रश्न येतो कुठे? अजित पवारांकडे दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीच काही दडवत नाहीत. या कारखान्याशी अजित पवारांचा काही संबंध आहे की नाही माहीत नाही. बऱ्याच कारखान्यांशी त्यांचा संबंध नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

म्हणून उद्योग सुरू
सरकार जाण्याचा प्रश्न संपलेला आहे. सरकार जात नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच रेड टाकणं आणि एजन्सीचा गैरवापर करणे हा उद्योग सुरू झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

सनसनाटीसाठी प्रयत्न
आयकर विभागाला काही माहिती हवी असेल तर त्यांनी विचारल्यावर सर्व कारखाने त्यांना माहिती देऊ शकले असते. पण धाड घालायची आणि सनसनाटी निर्माण करायची. एकाच वेळी धाड टाकायची, पहाटे धाड टाकायची आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा त्यांनी केला.

देशाच्या एजन्सी भाजप चालवतंय
आमचा कायद्यावर विश्वास आहे. भुजबळांना असाच त्रास दिला. शेवटी न्यायालयाने त्यांना न्याय दिला. आमचे सर्व नेते सर्व ठिकाणी निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांनी केलेला नसताना केवळ धाडसत्रं करून त्यांना बदनाम केलं जात आहे. आमच्या लोकांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे. काल परवा एनसीबीच्या रेडमध्ये भाजपचे कार्यकर्ते होते. त्यामुळे या देशाच्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही. त्यामुळे समोरच्या विरोधकांना बदनाम करणं, नामोहरण करणं हाच त्यामागचा उद्देश आहे. त्यापेक्षा वेगळं काही आहे असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र बंदच्या हाकेचा परिणाम
लखीमपूरला जी घटना घडली, त्यावर आम्ही तिन्ही पक्षांनी खेद व्यक्त केला. सोमवारी आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली म्हणून भाजपने संतापून ही प्रतिक्रिया दिली आहे. जालियनवालाबाग हत्याकांडासारखाच हा प्रकार आहे. त्यामुळेच दुसरीकडे लक्ष वेधण्याचं काम सुरू आहे. लखमीपूरच्या घटनेला भाजप जबाबदार आहे. जालियनवाला बागे सारख हे हत्याकांड केलं आहे. असं धाडसत्रं करून लक्ष वेगळ्या दिशेने वळवण्याचं काम भाजप करत आहे, असं पाटील म्हणाले.