अजित पवार यांच्या कार्यक्रमावर भाजपा नेत्यांचा बहिष्कार – जगताप डेअरी उड्डाण पुलाचे दुसऱ्यांदा उद्घाटन, शहराचे राजकारण तापले

0
366

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पांना भेटी देण्यासाठी आज आले. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला. कधीकाळी दादांचे उजवे-डावे असलेल्या भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी तसेच भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही अजितदादांच्या कार्य़क्रमांवर बहिष्कार टाकला होता. महापालिकेतील सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनीही पत्रकारांशी बोलताना, भाजप काळातच पूर्ण झालेल्या या पुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठीच पुन्हा अजित पवार यांनी उद्घाटन करावे याबद्दल खेद व्यक्त केला. कोरोनासाठी बंदच्या दोन महिन्यांत शहर भेटीची त्यांना गरज वाटली नाही, मात्र उद्घाटनासाठी निमित्त काढून ते आले याचेच आश्चर्य वाटते, असे ढाके म्हणाले.

औंध-रावेत बीआरटी मार्गावर पिंपळे सौदागर येथील साई चौकात (जगताप डेअरी चौक) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने उड्डाणपूल उभारला आहे. त्याच्या रावेतकडून औंधकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्‌घाटन वर्षा पूर्वी झाले होते. रहादारीस पूल खुलाही केला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे औंधकडून रावेतकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, उद्‌घाटन बाकी होते. स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार महापौर उषा ढोरे यांनी नऊ मार्च रोजी त्या मार्गिकेचे उद्‌घाटन केले. मात्र, दुसऱ्या दिवशी प्राधिकरणाने पुलाच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकून वाहतूक रोखली होती. पुलाचे काम बाकी असल्याचे काम त्या वेळी करण्यात आले होते. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पालकमंत्री अजित पवार यांनी उद्‌घाटन केले. या कार्यक्रमावर शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. महापौर ढोरे यांनी पाठ फिरवली. एवढेच नव्हे तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे दोघेही फिरकले नाहीत.

पालकमंत्र्यांनी केला सोशल डिस्टंसिंगचा भंग : भाजप
गेल्या तीन महिन्यात पुलाचे कोणतेही काम झाले नाही. केवळ पालकमंत्री अजित पवार यांची वेळ मिळत नव्हती, त्यांच्या हस्तेच उद्‌घाटन करायचे, अशी भूमिका घेतल्यामुळे म्हणून नागरिकांना वेठीस धरले. पालकमंत्र्यांनी सोशल डिस्टंसिंगचाही भंग केला आहे, असा आरोप महापालिका सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला. भाजपच्या काळात पुलाचे काम झालेले होते. त्याचे श्रेय घ्यायचे असते तर आमच्या नेत्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले असते. परंतु, त्याची वाट न पाहता केवळ लोकांच्या आग्रहास्तव आम्ही महापौरांच्या हस्ते नऊ मार्च रोजी केले होते, असे ही ढाके यांनी सांगितले.

कोरोना वॉर रूमची पाहणीलाही भाजप नेते अनुपस्थित
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने मुख्य प्रशासकीय इमारतीत उभारलेल्या वॉर रूमला भेट देऊन अजित पवार यांनी माहिती घेतली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वॉर रूम व शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती पवार यांना दिली. पालकमंत्र्यांच्या वॉर रूम भेटीचा कार्यक्रम त्यांच्या दौऱ्यात नव्हता. मात्र, ते वॉर रूमला भेट देणार असल्याचा निरोप आम्हाला ऐनवेळी देण्यात आला. मी व महापौर उषा ढोरे महापालिकेत पोहचेपर्यंत पालकमंत्री तेथून निघाले होते, असेही ढाके यांनी सांगितले.

जबाबदारी वाढल्याने पिंपरीत जास्त येऊ शकत नाही : पवार
राज्याची जबाबदारी असते. मुंबईत थांबावं लागतं. त्यामुळे शहरात फारसं येऊ शकत नाही. आजही आषाढी वारीनिमित्त बैठक आहे. या अडीच महिन्यात अनेक धर्म, पंथांचे सण येऊन गेले. त्यात अडचणी आल्यात. असे सण आपल्याला घरात बसूनच साजरे करावे लागले. प्रशासनाला आपण सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. कोरोनासाठी सर्वांची मदत घेण्याचे काम सुरू आहे. त्याला आपला सर्वांचा पाठिंबा गरजेचा आहे. आज पंतप्रधान देशाला उद्देशून बोलतील. ते काय निर्णय घेतील, संदेश देतील, त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आपणांस ग्वाही देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.