Maharashtra

“अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी ही नैतिकता. अन् मी राष्ट्रवादीत गेलो तर अनैतिकता का?” – एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

By PCB Author

October 22, 2020

जळगाव,दि.२२(पीसीबी) : भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे यांची मुलूखमैदान तोफ धडाडू लागली आहे. भाजपमधील आपले प्रतिस्पर्धी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी तुफानी हल्ला सुरू केला आहे. फडणविस यांनी आपल्यावर कशा पध्दतीने अन्याय केला याचा पाढा वाचायला खडसे यांनी सुरवात केली आहे. अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का? असा रोखठोक सवाल माजी मंत्री एकनाथ ख़डसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेशापूर्वी एकनाथ खडसे मुक्ताईनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

“पक्षाचा निर्णय सामूहिक आहे, असं समजून मी 40 वर्ष पक्षाच्या आदेशाचं पालन करत आलो. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्याचं कारण म्हणजे ते नेते होते, मुख्यमंत्री होते, दुसऱ्यांना क्लीन चिट दिली, तशी मलाही देता आली असती. विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना ते सांगू शकले असते की चुकीचं काम करु नका, पण त्यांनी परवानगी दिली. मला सांगितलं काळजी करु नका, तीन महिन्यात मंत्रिमंडळात परत घेऊ. आपण विश्वास ठेवायचा, नि विश्वासघात करायचा असं अनेकदा व्हायचं” अशी खदखद एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

“निर्णय घेणारा दुसरा माणूस नव्हता. विधानसभेला युती केली असती तर चित्र वेगळं असतं. विधानसभेनंतरही शिवसेनेसोबत युती असती तर दोन-तीन वर्ष आम्ही (भाजप) सरकारमध्ये असतो. राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला हवं होतं. अजित पवार यांच्यासोबत पहाटे पाच वाजता शपथ घेता, ही नैतिकता आणि मी राष्ट्रवादीत गेलो तर ही अनैतिकता का?” असा सवाल खडसेंनी विचारला.

“फडणवीस असेपर्यंत न्याय न मिळण्याची भावना” देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला, अशा भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल्या. मी फडणवीसांना विलन ठरवले नाही, फडणवीसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मी तिथे गेलो, त्यांना सांगितलं. आधी सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचे, पण आता भाजप ही व्यक्तिकेंद्री झाली आहे, म्हणजे एका व्यक्तीने निर्णय घ्यायचा आणि सर्वांनी मान्य करायचा, अशी खंतही खडसेंनी मांडली.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून मला ऑफर होत्या, आपण पक्षात आलात तर बरं होईल असं सांगितलं जायचं. पण संघटनात्मकदृष्ट्या विस्तारासाठी राष्ट्रवादीला इथे (मुक्ताईनगर आणि जळगाव) अधिक वाव आहे, कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे, राष्ट्रवादीकडे सक्षम आणि मोठं नेतृत्व नाही, म्हणून मी हा निर्णय घेतल्याचं खडसेंनी सांगितलं.

अनेक लोक भाजपमध्ये नाराज आहे, चंद्रकांत पाटीलही आता स्वत: निर्णय घेऊ शकत नाहीत, त्यांनाही फडणवीसांना विचारुन निर्णय घ्यावे लागतात. एकाही नेत्याने मी भाजप सोडणार, हे कळाल्यावर फोन केला नाही, चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. मी अमित शाह, पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो, चार वर्षात एकही नेता नाही यांची भेट घेतली नाही, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.