अजित पवार प्रॅक्टिकल टार्गेट; २०२४ ला सुप्रिया सुळेच मुख्य टार्गेट – चंद्रकांत पाटील  

0
782

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत आमची रणनिती कमी पडली. बारामती, इंदापूर, भोर विधानसभा मतदारसंघात आम्हाला कमी मते मिळाली. यामुळेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा निसटता विजय झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमचे टार्गेट असले, तरी ते प्रॅक्टिकल असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणे हेच आमचे मुख्य टार्गेट असेल, असे सुचक विधान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पालकमंत्री पाटील यांनी आज (मंगळवार) मोरवाडीतील पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर भाष्य केले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे,  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, पिंपरी-चिंचवड शहर भाजप सरचिटणीस सारंग कामतेकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे  भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील जनतेला विश्वास देण्याचे काम करणार आहे. निव्वळ निवडणुकीपुरते येता हा लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी १५ दिवसांतून बारामतीला जाणार आहे. लोकांच्याबद्दल प्रेम आहे का? लोकांच्यासाठी काम करता का? लोकांबद्दल आदर आहे का? हे पाहून लोक मतदान करत असतात, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

बारामती, भोर, इंदापूर विधानसभा मतदार संघात आम्ही कमी पडलो. आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अधिक ताकदीने उतरणार आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.