अजित पवार पुन्हा एकदा भल्या पहाटे पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी पोहोचले !

0
392

पुणे,दि.२५(पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे पावणे सहा वाजता पुणे स्टेशन येथील मेट्रो कामाची पाहणी केली. पवार यांनी सलग दुसऱ्या शुक्रवारी पुणे मेट्रोच्या कामाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोथरूड येथील मेट्रोचा डेपो आणि पुणे स्टेशन येथील प्रस्तावित मल्टिमोडल इंटिग्रेशन आणि मेट्रोच्या भुयारी मार्गाची पाहणी केली. कृषी महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट दरम्यानच्या दीड किलोमीटरच्या बोगद्यामध्येही ते जाऊन आले.

पवार यांनी गेल्या शुक्रवारी सकाळीच पिंपरीतील मेट्रोच्या कामाची पाहणी करत मेट्रोतून प्रवासही केला होता. त्याशिवाय नळस्टॉप आणि स्वारगेट येथेही त्यांनी भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता. शुक्रवारी पुन्हा सकाळी सहा वाजताच पवार मेट्रोच्या पुणे रेल्वे स्टेशन येथील कामाच्या ठिकाणी पोहोचले. या ठिकाणी रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशनच्या इंंटिग्रेशनची माहिती त्यांनी घेतली. मेट्रोतून रेल्वेमध्ये आणि रेल्वेतून मेट्रोमध्ये ये-जा करताना प्रवाशांना कोणत्याही अडचणी येऊ नये, अशा दृष्टीने रेल्वेचा पादचारी पूल आणि मेट्रो स्टेशन जोडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. त्यानंतर पवार कोथरूड येथील हिल व्ह्यू डेपो येथे पोहोचले.

दरम्यान कोथरूडच्या कचरा डेपोचा जागेवर मेट्रोच्या डेपोची निर्मिती केली जात असून त्याचा होणारा कायापालट त्यांनी पाहिला. तसेच काही उपयुक्त सूचनाही केल्या. या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्यानंतर पवार मेट्रोच्या भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानाच्या येथे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी पोहोचले.