Pune Gramin

अजित पवार नव्हे, मी आमदार होणार की नाही हे पुरंदरची जनता ठरवेल – विजय शिवतारे  

By PCB Author

April 22, 2019

 पुणे, दि. २२ (पीसीबी) – पवार कुटुंबियांना इतिहासात कधीही नव्हता, इतका विरोध  होऊ लागला आहे, त्यामुळे अजित पवारांचे मानसिक संतुलन ढासळले आहे.  त्याचबरोबर संपूर्ण पवार कुटुंबियांचा मानसिक तोल ढासळला आहे. लोकशाहीमध्ये  आमदार कोणाला करायचा हे जनता ठरवते. त्यामुळे अजित पवार नव्हे, तर मी आमदार होणार की नाही, हे पुरंदर तालुक्यातील स्वाभिमानी जनता ठरवेल, असा पलटवार शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केला आहे.  

बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता रविवार झाली. यावेळी सभेत बोलताना अजित पवार यांनी विजय शिवतारे आता पोपटासाराखा बोलायला लागलाय.  तू यंदा कसा आमदार होतो तेच बघतो’ असा इशारा अजित पवार यांनी शिवतारे यांना दिला होता. यावर शिवतारे यांनी पवार यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवारने एकदा ठरवले की एखाद्याला नाहीच आमदार होऊन द्यायचे, तर तो नाहीच आमदार होत, अशा शेलक्या शब्दांत पवारांनी शिवतारे यांना इशारा दिला होता. दरम्यान यावरून पवार आणि शिवतारे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आगामी काळात या दोघांत आणखी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.