Maharashtra

अजित पवारांनी व्यावसायिक मित्र प्रमोद गोयंका यांना गायब केले; अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीचा गंभीर आरोप

By PCB Author

February 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा दाखला देत बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णामूर्तीने माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुचित्राचा मित्र प्रमोद गोयंका यांचे अजित पवार यांनी अपहरण केले असून गेल्या एक वर्षापासून तो बेपत्ता असल्याचे तिने म्हटले आहे. ही बाब आपल्याला गायत्री पंतप्रतिनिधी यांनी सांगितल्याचा दावाही सुचित्रा यांनी केला आहे. सुचित्रा यांनी आपल्या ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर हे आरोप केले आहेत.

सुचित्रा कृष्णमूर्तीने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, प्रमोद गोयंका हा माझा मित्र गेल्या एक वर्षापूर्वीपासून गायब झाला आहे. प्रमोदचे अजित पवार यांच्यासोबत व्यावसायिक संबंध होते. त्या दोघांमध्ये वर्षभरापूर्वी व्यवसायावरुन वाद झाले. त्यामुळे अजित पवार यांनी प्रमोद गोयंकाला धडा शिकवण्याची शपथ घेतली होती, असे गायत्री पंतप्रतिनिधीने आपल्याला सांगितल्याचा दावा सुचित्राने केला आहे. प्रमोद गायब झाल्याच्या घटनेला आज बरोबर एक वर्ष झाले आहे. प्रमोद कसा गायब झाला याबाबत त्याचे सर्व मित्र आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तसेच नक्की काय झाले आहे याबाबत त्यांनाही कळेनासे झाल्याचे सुचित्राने म्हटले आहे.

प्रमोदचा भाऊ विनोद गोयंकांनी आपल्याला सांगितले की, प्रमोदचे सर्व व्यवसाय अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. याची अद्याप चौकशी का करण्यात आलेली नाही? आपण माफियांच्या राज्यात राहत आहोत का? असा सवालही त्याने केला असल्याचे सुचित्राने ट्विटरवर म्हटले आहे.