Pune

अजित पवारांनी काय दिवे लावले ? ते जनतेला माहीत आहे – गिरीश बापट

By PCB Author

September 29, 2018

 पुणे, दि. २९ (पीसीबी) –  मुठा कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी  माहिती  पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज (शनिवार) येथे दिली. ते पुढे म्हणाले की,  ही वेळ राजकारण करण्याची नाही. मात्र, राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार  यात विनाकारण राजकारण आणत आहेत. ते जलसंपदा  मंत्री  असताना  या कालव्यासाठी काय दिवे लावले, हे जनतेला माहीत आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

बापट  भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनिमित्त मुंबईत होते.  त्यामुळे त्यांना  घटनास्थळी   येता आले नाही.  यावर   पवार यांनी त्यांच्यावर  टीका केली होती. जनतेला मदत करण्याऐवजी बापट यांना  निवडणुकीची  तयारी महत्त्वाची वाटत आहे,  अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती. या टीकेला बापट यांनीही  प्रत्युत्तर    दिले आहे.

दरम्यान, दांडेकर पूल परिसरातील मुठा कालव्याचा डागडुजीच्या कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर   दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.