अजित पवारांना ईडीकडून पुन्हा दणका: मावस भावाच्या घरावर ईडीकडून छापा

0
247

पुणे, दि.२८ (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केल्याची घटना ताजी असतानाच अजितदादांना आणखी एक धक्का बसला आहे. अजितदादांचे मावस भाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीने सकाळीच धाड टाकली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

जगदीश कदम हे दौंड सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. ते अजित पवार यांचे मावस भाऊ आहेत. कदम हे सहकार नगरमध्ये राहतात. त्यांच्या घरी आज सकाळीच ईडीने धाड मारली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कदम हे मुंबईत आहेत. घरी ईडीने धाड मारल्याचं कळताच कदम हे मुंबईहून पुण्याकडे जायला निघाले आहेत.

दौंड सहकारी साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे दौंड साखर कारखान्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले होते. तर कारखान्यात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा खुलासा कारखान्याकडून करण्यात आला होता. त्यानंतरही ईडीकडून धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबर 2021 रोजी आयकर विभागाने दौंड साखर कारखान्यावर धाड मारली होती. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. आयकर विभागाच्या धाडीनंतरही दौंड कारखान्याचे संचालक कदम यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, दौंड साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यात कोणतीही अनियमितता नसल्याचा खुलासा केला होता.

दरम्यान, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने या आधीही कारवाई केली. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला होता. आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की काय माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सलाच माहिती, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी तेव्हा व्यक्त केली होती.