अजित पवारांचे व्यसनाधीनतेवर भाषण; अन् समोरून दारूड्या डुलत गेला…

739

बारामती, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते व  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात व्यसनाधीनतेवर बोलत  होते. त्यावेळी एक दारुडा त्यांच्या समोरून गेल्यानंतर  पवारांनी डोक्यावर हात मारून घेतला. ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही लोक सुधारायची नाहीत, असे म्हणत त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.

इंदापूर तालुक्यातील काझड या गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांना एक निवेदन देण्यात आले.  त्या निवेदनात अवैध पद्धतीने होणारी दारूबंदी बंद व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. यावर पवार यांनी या गावात दारू विकली जाते हे वाईट असून व्यसनाधीन होऊ नका, असा सल्ला दिला.

पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक एक दारूडा डुलत डुलत चक्क मंचासमोरून निघाला.  हे पाहताच अजित पवार यांना आश्चर्य वाटले.  त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. त्या तळीरामाला बघत पवार यांनी ‘हा काय चंद्रावरती गेला वाटतं, एवढ भाषणं करून देखील माझ्यासमोरच हा डुलत डुलत आलाय. आता काय करायचं, कधी कधी वाटतं ब्रह्मदेवा तू खाली आला तरीही ही लोकं सुधारायची नाहीत, असे पवार म्हणाले. यावर सभेत एकच हशा  उसळला.