अजित दादा मी तुमचा सदैव आभारी राहीन; रितेश देशमुखची भावुक पोस्ट

0
646

मुंबई,दि.१५(पीसीबी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ मार्गाला देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील घोषणा केली असून कार्यवाही सुरु करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाला दिली आहे. यासंदर्भात विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने अजित पवारांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत.

वडिलांचं नाव मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला देण्यात येणार असल्यामुळे रितेश देशमुख भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याने आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ‘श्री विलासराव देशमुखजी यांनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन, अजित दादा,’ असं रितेश देशमुख याने ट्विट केले आहे. 

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या.

दिवंगत विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. तसेच एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे होणारे अपघात व नागरिकांमध्ये त्याबद्दल असलेल्या नाराजीची दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.