Banner News

अजितदादा, मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारी गिधाडे तुमच्या आजुबाजूलाच – थर्ड आय – अविनाश चिलेकर

By PCB Author

May 01, 2021

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारी अवलाद काही ठिकाणी असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले. एक हजार एक टक्के दादा खरे बोलले. दुर्दैव असे की, त्यातीलच काही अवलादी अजितदादा तुमच्या अवतीभवती आणि भाजपा प्रमाणे राष्ट्रवादीतसुध्दा आहेत. कोरोनाचे महासंकटालाच इष्टापत्ती समजून खोऱ्याने नाही तर पोत्याने पैसे काढायचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने हातात घेतलाय. त्यात काही नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांनी कोट्यवधी रुपयेंची लूट चालवली आहे. कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळले, इतका निर्लज्जपणा चाललाय. भाजपामधील त्या भ्रष्ट, लालची, लफडेबाज हरामखोरांना साथ देणारे राष्ट्रवादीतीलच काही नगरसेवक आहेत. शुक्रवारी (३० एप्रिल) चे स्पर्ष हॉस्पिटलचे प्रकऱण त्याचा उत्तम नमुना आहे. महापालिका सेवेतील काही डॉक्टर्स, सत्ताधारी, विरोधक ब्लॅकमेलर नगरसेवक आणि दलाल यांनी मिळून कोरोनाचे अक्षरशः दुकान थाटले आहे. नगरसेवकाने एखाद्या सामान्य नागरिकाला गरिबाला मोफत उपचार मिळतात म्हणून महापालिकेच्या कोव्हिड सेंटरला पेंशटसाठी आयसीयू बेड मागितला तर मिळत नाही. दुसरीकडे खासगी हॉस्पिटचे डॉक्टर किंवा दलाला एक लाख रुपये घेऊन कोव्हिड सेंटरमध्ये बेड मिळवून देतात. अगदी पैसे दिल्या घेतल्याच्या पुरव्यासह हे सिध्द झाले. त्याचे रेकॉर्डींग आहे, पण महापालिका प्रशासन त्यावर स्वतःहून कारवाई करत नव्हते, हे सुध्दा खूपच संशयास्पद होते. महापालिका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षांच्या नगरसेवकांनी या विषयावर आयुक्त राजेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला तेव्हा कुठे चौकशी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाले. याचाच गर्भीतार्थ लक्षात घ्या. देशात-राज्यात कुठेही अन्याय होताना दिसला तर सर्वोच्च न्यायालय असो वा उच्च न्यायालय स्वतःहून (स्यू मोटो) खटला दाखल करून घेते. इथे चोर, चोरी, साक्षिदार सगळे अगदी स्पष्ट दिसत असतानाही प्रशासन ढिम्म बसून असेल तर त्याचा अर्थ प्रशासनासुध्दा अप्रत्यक्षपणे या अवैध लुटमारीत सामिल आहे. अजितदादा, तुम्ही खरे तर किमान राष्ट्रवादीतील अशा चोरट्या, भामट्या नगरसेवकांना पाठिशी न घालता घरचा रस्ता दाखवला पाहिजे. ज्या मुख्याध्यापिकेला जंबो कोव्हीड मध्ये दाखल केले होते, त्यांचा चार तासात निधन झाले. यालाच म्हणतात मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे. दादा तुमच्या आजुबाजूलाच ही गिधाडे फिरतात त्यांचा प्रथम बंदोबस्त करा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेससुध्दा भाजपाच्या `मिलबाटके खावो`, धोरणात सामिल आहे, असे म्हणावे लागेल. आता महापालिका आयुक्त खरोखर गुन्हा दाखल करून सत्य समोर आणतील आणि या लुटारूंना शासन करतील अशी, भाबडी अपेक्षा ठेवू या.

कुंदन गायकवाड, विकाय डोळस यांचा सत्कार करा – महापालिका शाळेतील एका मुख्याध्यापिकेला कोरोनाची बाधा झाली होती. नव्यानेच सुरू झालेल्या वाल्हेकरवाडी येथील पदमजा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर होत गेली म्हणून व्हेंटीलेटर बेडची शोधाशोध सुरू झाली. नगरसेवकांनी त्याबाबत स्पर्श हॉस्पिटल संचालित ऑटोक्लस्टर येथील महापालिकेच्या कोव्हिड सेंटर मध्ये विचारणा केली असता, जागा असूनही स्पष्ट शब्दांत `नाही` सांगितले. दुसऱ्या क्षणाला पदमजा हॉस्पटलमधील एका डॉक्टरने फोन केला असता, त्याच कोव्हिड सेंटरमध्ये एक लाख रुपये देऊन बेड मिळाला. रुग्णाच्या नातेवाईकाने केवळ पेशंटचा जीव वाचविण्यासाठी एक लाख रुपये दिले. २० हजार रुपये खासगी डॉक्टरने आणि ८० हजार कोव्हिड सेंटरच्या संचालकाने घेतले. दुर्दैवाने त्या मुख्याध्यापिका मृत झाल्या. त्यानंतर हा सर्व प्रकार भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस यांच्या कानावर आला. त्यांनी शहानिशा केली असता सत्य समोर आले. हे प्रकरण चिघळले तर भाजपाची मोठी बदनामी होईल, असा कांगावा करत सत्ताधारी नेते, राष्ट्रवादीचे दोन- तीन नगरसेवक गायकवाड यांच्या घरी गेले. १५ लाख रुपये देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनीच तसा गौप्यस्फोट महापालिकेच्या महासभेत केला. गायकवाड, डोळस यांनी १५ लाख नाकारलले म्हणून त्यांचा खरे तर भाजपाने जाहीर सत्कार केला पाहिजे. कारण त्यंनी मांडवली केली असती तर प्रकरण मिटले असते. सर्व प्रकरण चव्हाट्यावर आले आणि महासभेत त्यावर सहा तास अत्यंत गंभीर चर्चा झाली. प्रश्न असा आहे की, पदमजा हॉस्पिटलच्या डॉक्टरांना किंवा कोव्हिड सेंटरच्या संचालकांनी इतकी गंभीर चूक केली असेल तर त्यांना वाचविण्यासाठी सत्ताधारी नेत्याने आटापीटा का करावा. पद्मजा मध्ये कोणाची भागीदारी आहे, कोव्हीड सेंटरमध्ये कोण नगरसेवक अप्रत्यक्षपणे भागीदार आहेत याचाही आता सखोल तपास झाला पाहिजे. हे एक उघडकिस आलेले प्रकरण, अशी शेकडो प्रकरणे असल्याचे आता बोलले जाते. मग महापालिका प्रशासन काय डोळे झाकून काम करते का. स्मशानात, पैसे खाता, अंत्यसंस्कारात पैसे खाता, पेशंटला मोफत सेवा असताना रुग्णवाहिकेत लूट करतात, रेमडेसिवीर इंजेक्शन १४०० रुपये असताना बाहेर काही मेडिकल आणि हॉस्पिटलमध्ये ४०,००० हजारात विकतात, कोरोनाच्या जेवणार पैसे खाता, मास्क मध्ये पैसे खाता, पीपीई किट मध्ये खाता, रुग्णांच्या औषधातही पैसे खातात. भस्म्या रोग झालेली ही गिधाडे कोण कोण त्यांची यादी तयार करून ती टीपली पाहिजेत. हे समाजसेवक नाहीत तर समाजसेवेचा धंदा कऱणारे दलाल आहेत. नगरसेवकाच्या नावाला काळीमा आहेत.

स्पर्श ने ६ कोटी लुटले तरीसुध्दा त्यांनात काम –

महापालिकेने पहिल्या कोरोना लाटेत भोसरी मध्ये कोव्हिड सेंटर सुरू केले होते, त्याचे संचलन स्पर्श हॉस्पिटलकडे होते. त्यावेळी एकही रुग्ण दाखल नसताना करारात ठरले होते त्यानुसार सहा कोटी रुपयांचे बिल त्यांना दिले. राष्ट्रवादी नगरसेवक योगेश बहल यांनी त्याचा पर्दाफाश केला आणि चौकशी करणे भाग पडले. दोन महिने होऊन गेले तरी त्या चौकशीचे भिजत घोंगडे कायम आहे. मुळात एकही रुग्ण नसताना ६ कोटी रुपये बिल दिलेच कसे याचा जाब तत्कालिन अतिरिक्त आयुक्त यांनी दिला पाहिजे होता. राष्ट्रवादीतील एक नगरसेविका जी पार्थ पवार यांच्या विशेष मर्जितील समजली जाते तिच्या सांगण्यावरून ही रक्कम दिली गेली, असे सांगतात. इतके असूनही पुन्हा त्याच स्पर्श हॉस्पिटलला काम दिले जाते याचा अर्थ हे ऋणानुबंध कायम आहेत. पाच सहा डॉक्टर्स जे या पेशाला काळीमा आहेत, ते सगळे मिळून हा `उद्योग` करतात. मास्क खरेदीत लाखो रुपये खाल्ले असा आरोप पुराव्यासह राष्ट्रवादीच्याच नगरेसिवका मंगला कदम यांनी केला होता. त्यातसुध्दा हा घोटाळा करणारी राष्ट्रवादीचीच नगरसेविका आणि भाजपाचे दोन नगरसेवक असल्याचे समोर आले आणि सर्वांची बोलती बंद झाली. तोंडाल रक्त लागलेलं जंगली श्वापदा सारखी यांची अवस्था झाली आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. दादा, ते भाजपाच्या दोन्ही आमदारांकडून बिलकूल अपेक्षित नाही, ते तुम्हीच करू शकता.

कोरोनातील सर्व खरेदीची चौकशी गरजेची – सत्ताधारी भाजपाला जनतेने स्वच्छ कारभारासाठी निवडूण दिले होते, पण त्यांनी महापालिकेचा अक्षरशः उकिरडा केला. कुठल्याही राष्ट्रीय आपत्तीत जीवाची पर्वा न करता मदतीला धावून जाणारे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या स्वयंसेवक व पदाधिकारी यानी आपलेच राजकीय अंग असलेल्या शहर भाजपा शुध्दीकरणाची मोहिम आता हाती घेतली पाहिजे. आज कोरोना ही सेवेची संधी असताना भाजपाचे नगरसेवक लूट करत असतील तर त्यांचा कान धरण्याचा अधिकार संघाच्या मंडळींना आहे. ते आमचे नाहीत, अशी कातडीबचाव भूमिका घेणे म्हणजे हा सुध्दा पळपुटेपणा असेल. कोरोना मध्ये कुठेकुठे लूट होती याची जंत्री खूप मोठी आहे. जेवण, मास्क, पीपीई किट, कोव्हिड सेंटर, सल्लागार अशी जंत्री आहेच. आता हीच संधी समजून आणखी सुमारे २५-३० कोटींचा कामे काढली आहेत. महापालिकेच्या आकुर्डी, भोसरी, जिजामाता, भोसरी या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पाईपलाईनचे काम २६.३१ कोटींचे १८.४१ कोटी रुपयांवर आले, कारण भाजपाच्या नेत्यांनी केलेली ठेकेदारांची रिंग फसली. जागृक नगरसेवकांमुळे ८ कोटी रुपये वाचले. खरे तर हे काम ५-६ कोटींचेच आहे, असेही सांगण्यात येते. आता चार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करायचेत तर त्यातसुध्दा नेते नगरसेवकांची भागीदारी, दामदुप्पट दराने हे काम देण्याचा उद्योग सुरू आहे. चार हॉस्पटलच्या फरर्निचरचे काम पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्पर्श हस्पिटलशी संबंधीत त्या वादग्रस्त नगरसेविकाला द्यायचे घाटते आहे. मास्क खरेदीत किती खाल्ले हे उघड झाले पण कारवी शून्य झाली. त्यामुळे धाडस वाढले आहे. आपत्तीमध्ये निविदेशिवाय खरेदी यांचा अर्थ दरोडेखोरी, वाटमारी नव्हे. जे जे आवश्यक आहे त्या साधन सामग्रीची खरेदी करा, पण आपण हे राष्ट्रकार्य करतो या भावनेतून ते करा. भाजपाचा तो संस्कार आहे. आज भाजपामध्ये लूट करणारे आयात नगरसेवकांना तो संस्कार दिसत नाही, परिणामी भाजपा नाहक बदनाम होते. संघ दक्ष होणार का…