“अजितदादांना म्हटलं मला परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो.पण…”; शशिकांत शिंदे आक्रमक

0
331

सातारा, दि.२० (पीसीबी) : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे भाजपवर आणि किरीट सोमय्यांवर आक्रमक झाले. शिवाय भाजपचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. मला 100 कोटींची ऑफर दिली, असंही ते म्हणाले. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी म्हटलं होतं, मला परवानगी द्या, बेछूट आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांना मी पाहून घेतो. पण दादांनी सांगितलं शांततेने घ्या, म्हणून मी शांत बसलो.’

साताऱ्यातल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. आम्ही ईडीला पळवून लावणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मागे इकडे किरीट सोमय्या आले होते. मी दादांना म्हटलं होतं, मला परवानगी द्या, त्यांना मी बघून घेतो, पण दादांनी सांगितलं सबुरीने घ्या. म्हणून शांत बसावं लागलं, असं किरीट सोमय्या म्हणाले.

आपण परिणामांची चिंता करत नाही, असं सांगताना ईडी, आणि इनकम टॅक्सच्या आपण बापाला घाबरत नाही. कारण सध्याच्या राजकारणात ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, असं शशिकांत म्हणाले. भाजपचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. मला मागे 100 कोटींची ऑफर दिली होती. कधी कधी वाटतं ते 100 कोटी घ्यायला पाहिजे होते. पण त्यांना कल्पणा आहे की मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, असं शशिकांत शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी याअगोदरही केला होता. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता.

23 जानेवारी रोजी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या ऑफरसंदर्भात धक्कादायक खुलासा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अनेक माध्यमातून माझ्याशी संपर्क केला होता. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. तसेच तुम्हाला निवडून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत भाजपकडून 100 कोटी रुपये खर्च केले जातील, असेही मला सांगण्यात आले होते, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. मात्र, त्यावेळेस मी ऑफर नाकारली व भविष्यातही नाकारतच राहीन, असेही शिंदे यांनी सांगितले.