अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांची सांगवीतील कार्यक्रमाला उपस्थिती; मावळ मतदारसंघात लढणार असल्याच्या चर्चांना उधाण

0
2210

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – आमदार अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पार्थ पवार मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा यापूर्वीच सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर पार्थ पवार यांचीही छबी झळकली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या एक-दोन महिन्यात पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात काय काय घडामोडी घडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे नगरसवेक नाना काटे यांनी शनिवारी सांगवी येथे बेरोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याचे आमदार अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला अजितदादांचे पुत्र पार्थ पवार हे देखील उपस्थित होते. पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सांगवीतील कार्यक्रमाला त्यांच्या उपस्थितीने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजितदादा आपल्या पुत्राला मावळमधून उतरवण्यासाठी गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगवीतील कार्यक्रमाच्या त्यांच्या उपस्थितीवरून जाणवत आहे.

एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरही पार्थ पवार यांची छबी झळकली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या नावाची शहराच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही. या मतदारसंघात कोणालाही उमेदवारी दिली तरी राष्ट्रवादीत गटबाजी ही ठरलेली आहे. परंतु, अजितदादांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार असल्यास पक्षातील गटबाजी थोपवता येणे शक्य होणार आहे.

त्यामुळेच अजितदादांनी आपल्या मुलाला मावळच्या रणांगणात उतरवण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीला आता अवघे तीन महिने शिल्लक राहिले आहेत. एप्रिल महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. मावळ मतदारसंघात पार्थ पवार लढणार असल्याच्या चर्चांनी पिंपरी-चिंचवडचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमांना उपस्थित राहू लागल्याने ते लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यात पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात काय काय घडामोडी घडणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.