अजितदादांचा सिंचन घोटाळा; पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच मरगळलेल्या राष्ट्रवादीवर आणखी मोठा आघात, बचाव करताना पाहणे ठरणार मजेशीर

0
460

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – सिंचन घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचे एसीबीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादीला त्याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. आधीच शहरात राष्ट्रवादीला मरगळ आली आहे. त्यात आता पक्षाचा सर्वेसर्वाच ७२ हजार रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचे समोर आल्यामुळे जनतेला सामोरे जाताना शहरातील पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात सिंचन घोटाळा हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. तो खोडून काढून बचाव करताना स्वतः अजितदादा आणि शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची होणारी कसरत पाहणे मतदारांसाठी मजेशीर ठरणार आहे.