अजितदादांचा सिंचन घोटाळा; पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच मरगळलेल्या राष्ट्रवादीवर आणखी मोठा आघात, बचाव करताना पाहणे ठरणार मजेशीर

0
5057

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – सिंचन घोटाळ्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचे एसीबीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजितदादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादीला त्याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. आधीच शहरात राष्ट्रवादीला मरगळ आली आहे. त्यात आता पक्षाचा सर्वेसर्वाच ७२ हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचे समोर आल्यामुळे जनतेला सामोरे जाताना शहरातील पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात सिंचन घोटाळा हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. तो खोडून काढून बचाव करताना स्वतः अजितदादा आणि शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची होणारी कसरत पाहणे मतदारांसाठी मजेशीर ठरणार आहे.

२०१४ पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी सलग १५ वर्षे सत्तेत होती. या सत्ता काळात राज्याचे पाटबंधारे खाते राष्ट्रवादीकडे होते. या खात्याचे मंत्रीपद राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे या मातब्बर नेत्यांनी भूषविले. सत्तेच्या १५ वर्षांच्या काळात ७२ हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मर्जीतील कंत्राटदारांना कामे, कामांची रक्कम अव्वाच्या सव्वा वाढवून देणे, त्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आहेत. या सिंचन घोटाळा प्रकरणात काही स्वयंसेवी संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच सरकारकडूनही चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

सिंचन घोटाळ्यास अजित पवार हेच जबाबदार असल्याचे एसीबीने प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. एसीबीच्या या प्रतिज्ञापत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार असल्याचे स्पष्टपणे समोर आल्याने राष्ट्रवादीला आगामी काळात मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहर अजितदादांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला भाजपने हस्तगत केला असला, तरी तो पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीने अजितदादांची राजकीय पावले पडत होती. परंतु, आता यापुढे ते स्वतः सिंचन घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार म्हणून ओळखले जाणार असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची चांगलीच राजकीय कोंडी होणार आहे.

एसीबीच्या प्रतिज्ञापत्रामुळे अजितदादा आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आयते कोलित मिळाले आहे. सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अजितदादांच्या स्थानिक शिलेदारांना आता यापुढे विचार करूनच आरोप करावा लागणार आहे. अजितदादांचा सिंचन घोटाळा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात कळीचा मुद्दा ठरणार हे उघड आहे. सत्ताधाऱ्यांचे नेते पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर याच मुद्द्यावरून अजितदादा आणि राष्ट्रवादी किती भ्रष्टाचारी आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. अशा वेळी सिंचन घोटाळा झालाच नाही, हे सांगताना आणि बचाव करताना स्वतः अजितदादा आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. ती पाहताना मतदारांचेही चांगलेच मनोरंजन होणार आहे.