अजब: पुण्यात चोरट्याने चोरला कुर्बानीचाच बकरा

0
896

पुणे, दि. ११ (पीसीबी) – बकरी ईदला कुर्बानी देण्यासाठी पाळलेला बकरा एका चोरट्याने चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नरपतगिरी चौकात घडली.

याप्रकरणी बकऱ्याचे मालक यासर काझी (रा़. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. त्यानुसार, ताफिम बेग (रा. मंगळवार पेठ) याला बकऱ्यासह रंगेहात अटक करण्यात आली.

समर्थ पोलिसठाण्याचे सहायक पोलिस उप निरीक्षक शेट्टीबा शिंदे, पोलीस शिपाई पेरणे व मोरे हे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणे हद्दीत पायी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान ताफिम घाईगडबडीत उच्च प्रजापतीचा बकरा घेऊन नरपतगिरी चौकातून निघाला होता. पोलिसांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी ताफिमला थांबवले. त्याच्याकडे बकऱ्याबाबत विचारणा केली़ तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़. त्यामुळे पोलिसांना आणखी संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी सुरु केली़ तेव्हा त्याने बकरा नाना पेठेतून चोरी केल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी  बकरा मालकाचा शोध घेण्यात आला असता यासर काझी (रा. नाना पेठ) यांनी त्यांचा  बकरा चोरीस गेल्याचे सांगितले. बेग याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. दरम्यान, हा चोरीचा बकरा सानियन जातीचा असून, त्याची बाजारात किंमत २५ हजार एवढी होती. चोरीच्या बकऱ्याची तो बाजारात विक्री करणार होता. मात्र त्या अगोदरच पोलीस त्याच्यापर्यत पोहचले आणि त्याचा डाव फसला.