Desh

अगोदर मधुमेह, रक्तदाब, दमा असणारेच कोरोनेचा सर्वाधिक बळी

By PCB Author

December 26, 2020

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी करोनाचे २३,०६७ नवे रुग्ण सापडले असून एकूण ९७ लाख लोक बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सहव्याधींमुळे झालेले मृत्यू सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मृतांची संख्या ३३६ ने वाढून १ लाख ४७ हजार ९२ झाली आहे. सकाळी आठच्या आकडेवारीनुसार सत्तर टक्के मृत्यू हे मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, दमा, किडनी, कर्करोग अशा पूर्वीच्या आजारांमुळे झालेले आहेत.

करोनातून या काळात बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७ लाख १७ हजार ८३४ झाले आहे. त्यामुळे बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता ९५.७७ टक्के झाला आहे. मृत्युदर १.४५ टक्के आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता लागोपाठ चौथ्या दिवशी तीन लाखांखाली गेली असून ती २ लाख ८१ हजार ९१९ आहे. देशात एकूण संसर्ग दरात हे प्रमाण २.७८ टक्के आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्टला वीस लाखांवर, ३० ऑगस्टला तीस लाखांवर तर १६ सप्टेंबरला ५० लाखांवर गेली होती. १९ डिसेंबरला संख्या १ कोटींवर गेली. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या माहितीनुसार कोविड १९ च्या १६ कोटी ६३ लाख ५ हजार ७६२ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या असून गुरुवारी एका दिवसात ९ लाख ९७ हजार ३९६ चाचण्या करण्यात आल्या. आणखी एकूण ३३६ मृत्यू झाले आहेत.