अखेर १९ दिवसांनी हार्दिक पटेल यांनी घेतले उपोषण मागे

0
988

अहमदाबाद, दि. १२ (पीसीबी) – पाटीदार आरक्षण आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या मागणीसाठी गेल्या १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी अखेर आज (बुधवार) उपोषण मागे घेतले आहे. उपोषणादरम्यान पटेल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल केले होते.  

हार्दिक पटेल हे २५ ऑगस्टपासून अहमदाबादमधील निवासस्थानाजवळच उपोषणाला बसले होते. उपोषणादरम्यान भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा, प्रकाश आंबेडकर, यशवंत सिन्हा, जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हार्दिक पटेल यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते.

तर गुजरात सरकारने हार्दिक पटेल यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले होते. विश्व उनिया फाऊंडेशनचे सी के पटेल यांनी भाजपा सरकार आणि हार्दिक पटेल यांच्यात चर्चा व्हावी, यासाठी पुढाकार घेतला. मात्र, पाटीदार समाज आरक्षण समितीने यास नकार दिला होता. अखेर कोणत्याही तोडग्याविनाच त्यांना उपोषण मागे घ्यावे लागले आहे.