Maharashtra

अखेर राम कदम यांचा ‘त्या’ वादग्रस्त विधानावर माफीनामा

By PCB Author

September 06, 2018

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – भाजप आमदार राम कदम यांनी मुलीविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. विरोधकासह महिला संघटनांनी राम कदम यांचा निषेध केला होता. या विधानानंतर कदम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. अखेर आज (गुरुवारी) राम कदम यांनी ट्विटरवरुन महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला. त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असे कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे म्हटले होते. या विधानानंतर  वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राज्याच्या महिला आयोगाने कदम यांना नोटीसही बजावली आहे.