अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

0
1250

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज (गुरूवारी) तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. कर्मचारी संघटनेने याबाबत घोषणा केली. सरकारसोबतच्या चर्चेतून  ही कोंडी फुटण्यास यश आले आहे. आजच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचे आवाहन सरकारने संघटनेला केले होते. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मागील तीन दिवसांपासून संपावर होते. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांनी हा संप पुकारला होता. या संपात राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचारी सहभागी झाले होते.

सातव्या वेतन आयोगाचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा, पाच दिवसांचा आठवडा, जुन्या निवृत्तीवेतन योजनेचे पुनरुज्जीवन या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी  संपावर गेले होते. संपात मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.