अखेर युतीचे तोरण चढले; शिवसेना-भाजप लोकसभा-विधानसभा एकत्र लढवणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
788

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – शिवसेना भाजपची गेल्या २५ वर्षापासून युती आहे.या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात आणि देशात एकत्रपणे वावर केला आहे. दोन्ही पक्षात काही मुद्द्यांवर मतभेद झाले. मात्र दोन्ही पक्ष हिंदुत्त्ववादी पक्ष आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी आज (सोमवार) संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मुख्यमंत्री म्हणाले की,  आमचा मूळ विचार सारखाच आहे. म्हणूनच इतके वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिलो असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मागच्या विधानसभेच्या वेळी काही कारणांमुळे आम्ही एकत्र राहू शकले नाही. मात्र राज्यात युतीचे सरकार आणि केंद्रात एनडीएचे सरकार आम्ही एकत्रितपणे चालवत आहोत. सध्या काही पक्ष एकत्र येऊन काही आम्हाला विरोध करत आहेत. अशात आम्ही एकत्र यावे ही जनभावना होती तो कौल आम्ही मान्य केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी २३ जागा शिवसेना तर २५ जागा भाजप लढेल. विधानसभेच्या जागावाटपाबाबत भाजप मित्रपक्षांशी चर्चा करेल. त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यात शिवसेना-भाजप निम्म्या-निम्म्या जागांवर लढेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.