Banner News

अखेर मेगा भरतीला मुहूर्त मिळाला; ३४२ पदांच्या भरतीकरता जाहिरात प्रसिध्द

By PCB Author

December 10, 2018

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यातील मेगा भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य सेवा आयोगाकडून राज्य सरकारच्या  विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरता आज (सोमवार) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.यात महसूल विभागातील २३० पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. दरम्यान,   राज्यात मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा नुकताच लागू झाला आहे. त्यानुसार  काही पदे मराठा समाजासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांची भरती करण्यात येणार आहे.याबाबत आज जाहिरात प्रसिद्ध केली  आहे. या रिक्त पदांच्या भरतीकरिता राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेतील सर्वाधिक म्हणजे २३० पदे ही महसूल विभागातील आहेत. यामध्ये उप जिल्हाधिकारी (गट-अ) साठी ४० , तहसिलदार (गट-अ) ७७, नायब तहसिलदार (गट-ब) ११३ असे एकूण २३० पदांसाठी  लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतली जाणार आहे.

या पदांसाठी  उमेदवारांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज  दाखल करता येणार आहेत.  अर्ज करताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नोंदणी करणे व आयोगास अर्ज सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले होते.  राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर  या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले होते. आता  कायदा  लागू झाला आहे. त्यामुळे  आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये मराठा समाजाला काही जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.