Maharashtra

अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला शुक्रवारचा मुहूर्त

By PCB Author

August 04, 2022

– शिवसेनेचे कडवे टीकाकार रवी राणा, नितेश राणे यांचीही नावे चर्चेत

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याचं दिसतंय. येत्या रविवारी म्हणजेच सात ऑगस्ट रोजी नव्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील कॅबिनेट विस्तार होण्याची चिन्हं आहेत. यावेळी १५ ते १६ आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपकडून नऊ, तर शिंदे गटाकडून सात जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे राजभवनात याची तयारीही सुरु करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, दादा भुसे, उदय सामंत यासारख्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सोमवारी सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार करता येणार नाही, असे काही विधीज्ञांनी एबीपी च्या मुलाखतीत सांगितले आहे.

एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहोचला असून शिवसेना कोणाची, बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तर महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

पाटील, मुनगंटीवार, महाजन, विखे, दरेकर ही देवेंद्र फडणवीस यांच्या आतल्या वर्तुळातील नावं आधीपासूनच निश्चित मानली जात होती. मात्र रवी राणा, नितेश राणे ही दोन नावं सरप्राईड मानली जात आहेत. विशेष म्हणजे मंत्री निवडताना शक्कल लढवण्यात आली आहे, ज्या भागात शिवसेनेची ताकद कमी आहे, तिथल्या शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपद देण्याचं धोरण आखण्यात आलं आहे. भाजपकडून संभाव्य मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील,,सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, बबनराव लोणीकर, नितेश राणे, रवी राणा यांची तर शिंदे गटाकडून दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत.