‘… अखेर पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी अजितदादांच्या मर्जीतील ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती’

0
297

पुणे,दि.२४(पीसीबी) : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्तीचा तिढा अखेर एकदाचा सुटला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मर्जीतील अधिकारी असलेले विजय देशमुख यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशमुख यांनी बुधवारी (23 सप्टेंबर) रात्री उशिरा आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते, तो चर्चेचा मुद्दा झाला होता. त्यामुळे त्यांच्या जागी कोण येणार याची सर्वत्र चर्चा रंगली होती.

या पदासाठी अनेक अधिकाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधनी केली होती. ठाणे विभागाचे अतिरिक्त भूमापण अधिकारी अजिंक्य पडवळ यांच्यासह विजय देशमुख, पुण्यातील माजी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे ही नाव चर्चेत होती. यातील अजिंक्य पडवळ हे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मर्जीतील मानले जातात. त्यामुळे या पदावर नेमकं कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

देशमुख यांना पुणे जिल्ह्यात काम करण्याचा अनुभव आहे. यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत सह आयुक्त म्हणून त्यांनी काम केले होते. पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून यापूर्वी देखील त्यांनी या पदावर काम पाहिले आहे. मात्र काही न्यायालयीन प्रक्रियमुळे त्यांना या पदावर राहता आले नव्हते. विजय देशमुख हे सध्या पुण्यात कुळकायदा शाखेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.