Desh

अखेर दहावी बोर्ड परीक्षेबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

By PCB Author

April 15, 2021

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षावरती प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता अखेरीस केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) याबाबत मोठा निर्णय घेतला असून. यंदाच्या वर्षी (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी वेगळ्या पर्यायांचा अवलंब करण्यात येणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे ते १४ जून या कालावधीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार होत्या. मात्र यातील दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे काल बुधवारी जाहीर करण्यात आले. मूल्यमापनाच्या निकषांमध्ये काही बदल करून दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येतील. त्यानुसार करण्यात आलेले मूल्यमापन विद्यार्थ्याला मान्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधीही देण्यात येईल. याबाबत सविस्तर सूचना देण्यात येतील. मात्र मंडळाने बारावीची परीक्षा लांबणीवर टाकली आहे. त्याबाबत १ जून रोजी आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना नव्या वेळापत्रकाची पूर्वकल्पना किमान १५ दिवस आधी देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दुपारी घेतलेल्या बैठकीत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पालक संघटना, सामाजिक संघटनांनी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर परीक्षा घेण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वी ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले होते. तर राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे-जूनमध्ये घेणार असल्याचे शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले. आता ‘सीबीएसई’प्रमाणेच राज्यानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र राज्यातील परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.