Others

अखेर ‘त्या’ १६ खलाशांची सुखरूप सुटका

By PCB Author

June 17, 2021

– तटरक्षक दलाने मदत व बचावकार्य मोहीम राबवून केली सुखरूप सुटका

अलिबाग, दि.१७ (पीसीबी) : गुरुवारी पहाटे रेवदंडा खाडीत रेवंदडा बंदरातून निघालेला एमव्ही मंगलम हा मालवाहू तराफा (बार्ज) बुडला. या तराफावरील १६ खलाशांची तटरक्षक दलाने मदत व बचावकार्य मोहीम राबवून सुखरूप सुटका केली. हा मालवाहू तराफा रेवदंडा बंदरातून मुंबईच्या दिशेने निघाला होता. मात्र सकाळी साडेसातच्या सुमारास बंदरापासून साधारणपणे तीन किलोमीटर अंतरावर तो कलंडण्यास सुरवात झाली. तराफा बुडण्याची शक्यता दिसू लागल्याने त्यावरील खलाशी आणि कप्तानाने तटरक्षक दलाकडे तत्काळ मदत मागीतली. अपघाताची माहिती मिळताच दिघी येथील तटरक्षक दलाचे सुभद्रा कुमारी चौहान हे जहाज घटनास्थळी रवाना करण्यात आले. तर दमण येथून दोन चेतक हेलिकॉप्टर मदत व बचाव कार्यासाठी रेवदंडा येथे पाठवण्यात आले होते.

पाऊस आणि वाऱ्याचा जोर असल्याने समुद्र खवळलेला होता. त्यामुळे मदत व बचाव कार्य करणे आव्हानात्मक होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांनी तराफ्यावर अडकून पडलेल्या सर्व १६ खलाशांची सुटका केली. या सर्वांना नंतर रेवदंडा येथे आणण्यात आले. रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन सर्वांना रवाना करण्यात आले. या मदत व बचाव कार्यादरम्यान मेरीटाईम बोर्ड आणि पोलीस दलाचे कर्मचारी किनाऱ्यावर उपस्थित होते.