Maharashtra

अखेर त्या गर्भवतीचा रिक्षातच मृत्यू, माणुसकीला काळीमा फासणारी घटना

By PCB Author

June 01, 2020

ठाणे, दि. १ (पीसीबी) : मुंब्रा येथे एका गर्भवती महिलेला दाखल करण्यास 3 रुग्णालयांना नकार दिल्याने महिलेचा रिक्षातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर ठाण्यासह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या काळात रुग्णालयांच्या या असंवेदनशील आणि बेजबाबदार कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. तसेच या प्रकारातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. कोरोनाच्या महामारीतही खासगी रुग्णालयांची मुजोरी वाढत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी ही घटना ठाण्यातील मुंब्रा येथे घडली. वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून या गर्भवती महिलेला आपला प्राण गमवावा लागला. या महिलेचे नातेवाईक तिच्यावर उपचार व्हावेत म्हणून रिक्षातून वणवण फिरले. मात्र 3 रुग्णालयांना महिलेला दाखल करून घेण्यासच नकार दिला. अखेर उपचार न मिळाल्याने या महिलेचा रिक्षातच मृत्यू झाला.

या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गर्भवती महिलेचा भाऊ तिला घेऊन रिक्षात बसलेला दिसत आहे. तसेच ही महिला बेशुद्ध अवस्थेत असताना हा भाऊ तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. या महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते गर्भवती महिलेला दाखल करण्यासाठी 3 रुग्णालयांमध्ये गेले. मात्र तिन्ही रुग्णालयांना तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेचा शेवटी उपचाराच्या प्रतीक्षेत रिक्षातच मृत्यू झाला.

एकीकडे सरकार कोरोना सारख्या महामारीशी लढण्यासाठी ठाण्यात हजारो खाटांचे हाॅस्पिटल उभारत असल्याचं सांगत आहे. तर दुसरीकडे याच ठाण्यात गर्भवती महिलेला उपाचारा अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. यावरुन ठाण्यातील आरोग्य व्यवस्था किती ढिसाळ झाली आहे हेच स्पष्ट होत असल्याची टीका नागरिक करत आहेत. या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेने मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत.