Maharashtra

अखेर तो मृतदेह कुजला हो…माणुसकिला काळीमा

By PCB Author

May 20, 2020

विरार, दि. २० (पीसीबी) : आपली सरकारी यंत्रणा किती निगरगट्ट आहे, प्रशासन किती बथ्थड आहे त्याचा अनुभव एका राजस्थानी व्यापाऱ्याने घेतला. माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडली. मीरा-भाईंदरहून चालत वसईला जाऊन गावी राजस्थानला जाणारी रेल्वे पकडण्याच्या घाईत एका प्रवाशाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या मृताच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह मिळवण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले आणि शेवटी प्रशासनाची परवानगी मिळेपर्यंत मृतदेह कुजला होता. मंगळवारी दुपारी कुजलेला मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक राजस्थानला रवाना झाले आहेत.

मीरा-भाईंदर येथे राहणारे हरिश्चंद्र शंकरलाल जांगीर (४५) हे टाळेबंदीमुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाला कंटाळून आपल्या गावी राजस्थान येथे जाणार होते. त्यांना १४ तारखेला वसईवरून राजस्थानसाठी रेल्वे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ते प्रवासासाठी कोणतीही साधने नसल्याने तसेच खिशात पैसे.नसल्याने त्यांनी भाईंदर ते वसई असा पायी प्रवास केला होता. वसईत त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

वसईत त्यांचे कोणतेही नातेवाईक राहत नसल्याने त्यांचा मृतदेह हा विरारमधील शीत शवागृहात ठेवण्यात आला होता. पण या शीतगृहाचे तापमान आवश्यकतेनुसार नसल्याने हरिश्चंद्र यांचा मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली.

हरिश्चंद्र याचा भाऊ जयप्रकाश जांगीर याने दिलेल्या माहितीनुसार १५०० किलोमीटर प्रवास करून १७ तारखेला विरारमध्ये पोहोचलो असता विरार पश्चिम येथे असलेल्या शीतशवागृहातील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली की, शीतगृहातील वातानुकूलित यंत्रणा नियमित काम करत नाही. त्याचे तापमान ५ ते ६ अंश सेल्सियस असणे आवश्यक असताना त्याचे तापमान १८ अंश सेल्सियस होते. यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. तसेच महापालिकेने कोविड १९ च्या तपासणीसाठी नमुने २ दिवसांनी घेतल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास उशीर झाला.

अहवाल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाऊ शकत नसल्याचे पालिकेने सांगितले. तसेच विरारमधेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सक्ती केली गेल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. पण त्यांना आपल्या गावीच अंत्यसंस्कार करायचे असल्याने कोविड १९ तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी मिळवून मंगळवारी रुग्णवाहिका करून मृतदेह राजस्थान येथे नेला.

या संदर्भात अधिक माहिती देताना पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. तबस्सुम काझी यांनी माहिती दिली की, शीतशवागृहातील वातानुकूलित यंत्रणा सुरू आहे. त्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने तापमान कमी जास्त होत होते. आम्ही तातडीने तंत्रज्ञ नेऊन ती दुरुस्त केले आहे.