Desh

अखेर चीनची पाऊलं परतीच्या वाटेवर…

By PCB Author

July 06, 2020

लडाख, दि.६ (पीसीबी) : गलवान खोऱ्यात गेले अनेक दिवस भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. परंतू ते बदलण्याच्या वाटेवर आता हळूहळू सुरूवात झाली आहे. गलवान येथून चिनी सैनिकांच्या गाड्या मागे जात आहेत. लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी मागे जाण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. .

चिनी सैन्य गलवान, हॉटस्परिंग आणि गोगरा सीमेवर मागे जाताना दिसत आहेत. चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत. कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. पीएलए पीपी 14 येथून टेंट देखील काढण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान, गेले काही दिवस भारताने चीनविरोधात कठोर भूमिका घेत पाऊलं उचलली होती. तसंच तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे निमू (लडाख) दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवताना चीनला कठोर इशारा दिला होता. विस्तारवादाचं युग संपून आता विकासवादाचं युग सुरू झाल्याचं त्यांनी चीनला सांगितलं होतं.