Desh

अखेर गुरमीत राम रहीमला सुनावली जन्मठेपेची शिक्षा; रणजीत सिंह हत्या प्रकरणात मोठी घडामोड

By PCB Author

October 18, 2021

नवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) : प्रसिद्ध रणजीत सिंह हत्या प्रकरणात १९ वर्षांनंतर पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टाने सोमवारी डेराममुखी गुरमीत राम रहीमसह चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने राम रहीमला ३१ लाखांचा दंड ठोठावला. तर इतर चार दोषींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडातील अर्धी रक्कम पीडित कुटुंबाला दिली जाईल. या निर्णयाविरोधात राम रहीम उच्च न्यायालयात जाणार आहे. राम रहीम आणि इतरांना २००२ मध्ये डेराचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. शिक्षा घोषित करण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था कडक करत हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

ऑगस्ट २०१७ चा हिंसाचार पाहता, सुनावणीपूर्वी किंवा राम रहीमशी संबंधित कोणत्याही प्रकरणात शिक्षा घोषित करण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणा वाढवली जाते. २०१७ मध्ये बलात्कार प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर हिंसाचारात ३६ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयाकडे डेरा प्रमुखांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याचवेळी, राम रहीमने स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोहतक तुरुंगातून दयेची विनंती केली होती. दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. दरम्यान आता पुन्हा त्याला हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रणजीत सिंह यांची हत्या २००२ मध्ये १० जुलै रोजी झाली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) केला आणि संपूर्ण प्रकरण केवळ विशेष सीबीआय न्यायालयात चालले. या घटनेला १९ वर्षे उलटल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला राम रहीमसह पाच जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी १२ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती.