Pune

अखेर ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे देशभरात वितरण सुरू

By PCB Author

January 12, 2021

पुणे, दि. १२ (पीसीबी) : करोना प्रतिबंधक अशा ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला पुणे येथून वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन कंटेनर हे पोलिसांच्या बंदोबस्तासह पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, त्याआधी इन्स्टिटयूटच्या परिसरात या कंटेनरची पूजा करण्यात आली. परि मंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते हार घालून आणि नारळ फोडून या कंटेनर्सना मार्गस्थ करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत पेढे वाटून आनंद साजरा केला.

पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. पुणे विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी ८ वाजता रवाना होणार आहे. ८ फ्लाईटपैकी २ फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे.

भारत सरकारने लस खरेदीसाठी काल सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली होती. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विसिकत केलेल्या या लसीची निर्मिती पुणे स्थित सीरम इन्स्टिटयूटने केली आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असेल असे सीरमच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे.