अखेरच्या सत्रात भारताला दणके

0
174

अ‍ॅडलेड दि.१७ (पीसीबी) : दिवसाच्या पहिल्याच आणि रात्रीच्या अखेरच्या १३ षटकांत भारताला एकामागून एक दणके देत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस-रात्र कसोटीत पहिल्या दिवस अखेरीस वर्चस्व राखले. खेळ थांबला तेव्हा भारताने ६ बाद २३३ धावा केल्या होत्या. आर. अश्विन १५, तर वृद्धिमान साहा ९ धावांवर खेळत होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय खरे तर पहिल्याच षटकांत पृथ्वी शॉने चुकीचा ठरवला असे वाटले. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनी थोड्याफार प्रमाणात प्रतिकार केला. मात्र, अखेरच्या १३ षटकांत भारतीयांचा संयम सुटला. कोहली धावबाद झाला, रहाणे पायचित झाला. हनुमा विहारी देखील परतला. त्यामुळे स्थिर वाटणारा डाव दिवस अखेरीस अडखळलाच.

पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूला शॉ बाद झाल्यावर मयांक अगरवाल आणि पुजारा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पॅट कमिन्सने अगरवालचा बचाव भेदला. कमालीचा संथ खेळणाऱ्या पुजाराच्या साथीला कर्णधार विराट कोहली आल्यावर धावफलक जरा हलू लागला होता. या दोघांच्या ६८ धावांच्या भागीदारीने भारताला दिलासा मिळत असतानाच लियॉनच्या फिरकीने पुजाराला बाद केले. भारताच्या तेव्हा ३ बाद १८८ धावा झाल्या होत्या.

त्यानंतर कर्णधाराच्या साथीला उपकर्णधार रहाणे खेळायला आला. ही जोडी देखील झकास जमली. गुलाबी चेंडूचा टणकपणा गेल्यावर धावा होत असल्या तरी त्यात वेग नव्हता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सतत भारतीय फलंदाजीवर दडपण ठेवले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने प्रकाशझोतात नवा चेंडू घेतला आणि त्या २० मिनिटांच्या खेळात सामन्याचे सारे चित्र पालटले. या वीस मिनिटांत रहाणे आणि कोहली यांच्यातील सामंजस्याचे अभावाने कोहली धावबाद झाला. त्यानंतर स्टार्कने रहाणेला पायचित केले. दुसऱ्या बाजूने हेझलवडूने विहारीला देखील पायचित केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पुन्हा एकदा हक्काने वर्चस्व राखल्याचा आनंद झाला.

संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव ६ बाद २३३ (विराट कोहली ७४ (१८०), चेतेश्वर पुजारा ४३ (१६०), अजिंक्य रहाणे ४२ (९२), मयांक अगरवाल १७, हनुमा विहारी १६, वृद्धिमान साहा खेळत आहे ९, आर. अश्विन खेळत आहे १५, मिशेल स्टार्क २-४९, जोश हेझलवूड १-४७, पॅट कमिन्स १-४२, नॅथन लायन १-६८)