अखेरच्या मिनिटांत गतविजेत्यांविरुद्ध भारताचा गोल धडाका

0
238

टोकियो, दि.२९ (पीसीबी) : एरवी अखेरच्या काही मिनिटांत भारतीय हॉकीपटू कच खायचे. पण, आज गतविजेत्या अर्जेंटिनाविरुद्ध भारतीय वेगळेच भासले. त्यांनी अखेरच्या सत्रात एका मिनटांच्या अंतराने दोन गोल करत भारताचा विजय सुकर केला.

उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला या सामन्यातून गुण मिळणे अपेक्षित होते. बरोबरीने आशा कायम राहिल्या असत्या, पण विजयाने उपांत्यपूर्व फेरीवर शिक्कामोर्तब होणार होते. त्यामुळेच भारतीय खेळाडू जीव तोडून खेळत होते. त्याचेच प्रत्यंतर अखेरच्या सत्रात दिसून आले आणि एका मिनिटात दोन गोल करून त्यांनी अर्जेंटिनाचा ३-१ असा पराभव केला. या विजयाने नऊ गुणांसह त्यांचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

पू्वार्ध गोलशू्न्य बरोबरीत राहिल्यानंतर सामन्यातील सगळे नाट्य उत्तरार्धात घडून आले. सामन्याच्या ४३व्या मिनिटाला वरुण कुमारने गोल केला. त्यानंतर ५८व्या मिनिटाला विवेक सागर आणि ५९व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंग यांनी गोल करून भारताला विजय मिळवून दिला. या दरम्यान ४८व्या मिनिटाला शुथ कॅसेलाने अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली होती.

भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित असला, तरी गतविजेत्या अर्जेंटिनाला आव्हान राखण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या लढतीत विजय आवश्यकच असेल. सध्या ते पाचव्या स्थानावर आहेत. गटातील पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरीत जाणार आहेत. भारताची अखेरची लढत जपानशी होणार आहे.

अर्जेंटिना असेच उशिरा प्रतिहल्ला करते. पण, या वेळी आम्ही सतर्क होतो. अर्थात, आमच्याकडूनही अनेक संधी व्यर्थ गेल्या. त्यानंतरही संयम राखून तसेच नियोजनाप्रमाणे खेळ केल्यामुळे विजय मिळवू शकलो. आनंद नक्कीच आहे. आता जपानविरुद्ध आम्ही उपांत्यपूर्व फेरीचा सामना समजूनच खेळू.
-ग्रॅहम रीड, भारताचे प्रशिक्षक

आजच्या सामन्याचा खेळ बघितला, तर आक्रमक खेळ करून भारताने गतविजेत्यांवर दडपण राखले होते. पण, त्यांना अर्जेंटिनाच्या बचावफळीने फारसे यश मिळू दिले नाही. चेंडूवर सर्वाधिक ताबा राखून भारताने लढतीवर वर्चस्व मिळविले होते. तरी मंध्यतरापर्यंत गोल करू न शकल्याचे वाईट निश्चित वाटले असेल. तिसऱ्याच मिनिटाला मनप्रीतचा गोल करण्याचा प्रयत्न फसला. मनप्रीतच्या नेतृत्वाखाली आज मधल्या फळीने कमाल केली. त्यांनी चेंडूवर ताबा मिळवून तो राखताना गो करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. पण, पूर्वार्धात त्यांना गोलशू्न्य बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. भारताकडून श्रीजेशनेही आपली भूमिका चोख बजावली. दोन्ही संघांना पूर्वार्धात एकही कॉर्नर मिळवता आला नाही.

सामन्याच्या तिसऱ्या सत्रातही भारताने गो करण्याच्या संधी गमावल्या. प्रथम ३५व्या मिनिटाला गुरजंत सिंग, नंतर रुपिंदरपाल सिंग यांनी पाठोपाठ मिळालेले कॉर्नर वाया घालवले. त्यानंतर ४३व्या मिनिटाला वरुण कुमारने भारताला मिळालेला तिसरा कॉर्नर सत्कारणी लावला. अर्थात, ही आघाडी भारताला टिकवता आली नाही. आठच मिनिटांनी कॅसेलाने अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. लगोलग त्यांनी दोन संधीही निर्माण केल्या. पण, श्रीजेश भक्कमपणे त्यांच्या आड आला. सामना संपताना भारतीय खेळाडूंनी कमालाची वेगवान खेळ केला. त्यांती आक्रमणं अर्जेंटिनाच्या छातीत धडकी भरवणारी ठरली. त्याचा व्हायचा तोच फायदा झाला. एका मिनिटांत त्यांनी दोन केले. प्रथम विवेकने दलप्रितच्या प्रयत्नांना यश देताना चेंडूला स्टिकचा हलकासा स्पर्श करून जाळीत ढकलले. त्यांनंतर हरमनप्रीतने आठवा कॉर्नर सत्कारणी लावताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.