Maharashtra

अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी वाचवलं

By PCB Author

January 06, 2021

मुंबई, दि. 5 (पीसीबी) :मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे अक्सा बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव वाचला. 23 वर्षीय तरुणी समुद्रात उडी मारण्याच्या प्रयत्नात होती. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी भर समुद्राच्या पाण्यातून तिला ताब्यात घेतले.

पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांना काल (5 जानेवारी) याविषयी माहिती मिळाली होती. प्राची शाह नावाची 23 वर्षीय तरुणी अक्सा बीचला स्वतःचा जीव देण्यास जात असल्याचं त्यांना समजलं. त्यांनी तात्काळ मालवणी पोलीस ठाण्याला याविषयी कळवलं. पोलीस निरीक्षक रजाने आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांनी तत्काळ अक्सा बीचवर धाव घेतली. फोटोच्या सहाय्याने पोलिस तिचा शोध घेत होते. इतक्यात एक महिला समुद्रात कंबरेइतक्या पाण्यात जात असल्याचं त्यांना आढळलं. एपीआय कदम यांनी समुद्राच्या पाण्यात जाऊन तिला ताब्यात घेतले. पोलिसांच्या वक्तशीरपणामुळे तरुणीचा जीव बचावला. त्यामुळे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.