अक्कल कमी होती; हुशार असतो तर आयएएस अधिकारी झालो असतो – कुमारस्वामी

0
482

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी सोमवारी एका कॉलेज कार्यक्रमात सहभागी झाले असता आपल्या एका कबुलीने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. आपण एक कमकुवत विद्यार्थी होतो, त्यामुळे प्रश्न विचारले जातील या भीतीने कधीच पहिल्या बाकावर बसायचो नाही अशी माहिती त्यांनी दिली.

नॅशनल डिग्री कॉलेजचे विद्यार्थी असलेले कुमारस्वामी १२ वर्षानंतर आपल्या कॉलेजात आले होते. जयानगर येथे हे कॉलेज आहे. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतना कुमारस्वामी यांनी सांगितले की, ‘मी कमी अक्कल असणारा विद्यार्थी होतो. त्यामुळेच तास सुरु असताना प्रश्न विचारले जातील या भीतीने पहिल्या बाकावर बसायचो नाही’.

आपल्या कॉलेज आयुष्यावर बोलताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितलं की, ‘मी डॉक्टर राजकुमार यांचा खूप मोठा चाहता होतो. मी त्यांचे चित्रपट पाहत असे. जर मी चांगला आणि हुशार विद्यार्थी असतो तर आयएएस अधिकारी बनायला आवडले असते. माझे वडिल (माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा) मला नेहमीच काहीच कामाचा नसल्याचे म्हणत असते. आयुष्यात मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही असेही ते म्हणत’.

‘मी कॉलेजात असताना कशाचीही चिंता करायचो नाही. अत्यंत बेजबाबदारपणे वागायचो. पण आताच्या विद्यार्थ्यांनी जबाबदार झाले पाहिजे. कॉलेजचे विद्यार्थी कधीही विधानसभेत येऊन मला भेटू शकतात. त्यांनी कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज नाही’,असेही त्यांनी सांगितले.