अकोल्यात जुगार खेळणाऱ्या तीन नगरसेवकांसह २८ जणांना अटक

0
683

अकोला, दि. ६ (पीसीबी) – अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून अकोट नगरपालिकेतील तीन नगरसेवकांसह एका नगरसेविकेच्या मुलाला असे एकूण २८ जणांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी केली.

अटकेतील जुगारी नगरसेवकांमध्ये मुख्तार रवान अय्युब खान, सलीम नबीउल्ला खान, आरिफ मारुफ यांच्यासह नगरसेविकापुत्र मनोज चंदन यांचा समावेश आहे. तर जितेंद्र चंडालिया हा माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबातील आहे. याशिवाय इतर आरोपींमध्ये अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील माऊली मनोरंजन केंद्रावर जुगार अड्ड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांना मिळाली होती. यावर पोलिसांचे एक पथक घेऊन देशमुख यांनी माऊली मनोरंजन केंद्रावर धाड टाकली. यावेळी तेथे वरील सर्व आरोपी हे जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करुन ५० हजारांच्या रोख रकमेसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.