Desh

अकबर मीना बाजारमध्ये जाऊन महिलांची छेड काढायचा- भाजपा प्रदेशाध्यक्ष

By PCB Author

June 07, 2019

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी मुघल सम्राट अकबराबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. अकबर मीना बाजारमध्ये जाऊन महिलांची छेड काढायचा आणि एका राजपूत महिलेकडे अकबराला जीवाची भीक मागावी लागल्याचे वक्तव्य सैनी यांनी केले आहे. या प्रकरणावरुन राजस्थानमध्ये सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने सैनी यांच्यावर टिका केली केली.

गुरुवारी (६ जून) रोजी देशभरामध्ये मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. राजस्थानमधील जयपूर येथील भाजपाच्या प्रदेश मुख्यालयामध्येही मोठ्या उत्साहात महाराण प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. भाजपाने काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भाजपाने आयोजित केलेल्या या सोहळ्यानंतर सैनी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अकबराबद्दल वादग्रस्त विधान केले.

सैनी यावेळी बोलताना म्हणाले, ‘अकबराने मीना बाजारची स्थापना केली. तेथे केवळ महिलांना काम देण्यात आले होते. पुरुषांना मीना बाजारात जाण्यास बंदी होती. अकबर तेथे जाऊन महिलांसोबत दुष्कर्म करायचा. या सर्व घटनांची इतिहासामध्ये नोंद आहे.’

पुढे बोलताना सैनी यांनी मीना बाजार का बंद करण्यात आला याबद्दलही वक्तव्य केले. एका राजपूत महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता तिने अकबराला धडा शिकवल्याचा दावा सैनी यांनी केला आहे. ‘अकबराला किरण देवी यांची छेड काढायची होती. मात्र त्या सतर्क होत्या. त्यांनी अकबराला जमीनीवर पाडले आणि त्याच्या छातीवर छोटा सुरा ठेवला. त्यावेळी ‘हिंदुस्तानचा बादशाह तुझ्यासमोर नतमस्तक होतोय’ असे म्हणत अकबराने त्यांच्याकडे जिवाची भीक मागितली. या घटनेनंतर मीना बाजार बंद करण्यात आला,’ असे सैनी म्हणाले.