Desh

अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’; भारत हा अमेरिका, चीन, रशियानंतरचा चौथा देश- पंतप्रधान मोदी

By PCB Author

March 27, 2019

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांना संबोधित केले. भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले असून अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती मोदींनी दिली. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली. आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही, असे त्यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे, अशा आशयाचे ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मोदी नेमके काय बोलणार, याकडे देशभराचे लक्ष होते. अखेर दुपारी मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. यात मोदींनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या ऑपरेशन शक्तीविषयी माहिती दिली.

याअंतर्गत भारताने अंतराळात क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडल्याची माहिती मोदींनी दिली. लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारताने अँटी सॅटेलाइट मिसाइलद्वारे (उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र) एक उपग्रह पाडले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले. ३०० किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद करण्यात यश आले असून ही चाचणी यशस्वी झाल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे. अँटी सॅटेलाइट मिसाइलमुळे देशावर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहांवर वचक ठेवणे शक्य होणार आहे.