Videsh

अंतराळात अनियंत्रित झालेले चीनचे रॉकेट पृथ्वीवर कोसळणार; अमेरिकन शास्त्रज्ञांकडून सतर्कतेचा इशारा

By PCB Author

May 06, 2021

वॅाशिंगटन, दि.०६ (पीसीबी) : चीनने दि. २९ एप्रिलला अवकाशात रॉकेट पाठवले होते. परंतु हे रॉकेट अंतराळात अनियंत्रित झाले आहे. हे रॉकेट शनिवारी पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता अमेरिकन शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. हे रॉकेट सुमारे २१ टन वजनाचे असून घनदाट लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये ते कोसळू शकते. अवकाशात पाठवलेल्या रॉकेट वरील नियंत्रण गमावल्याने चिनी शास्त्रज्ञांवर टीका होत असाताना या रॉकेटबाबत महत्त्वाची माहिती अमेरिकेने दिली आहे. हे रॉकेट शनिवारी पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या ठिकाणी रॉकेट कोसळले हे सांगण्यात अद्यापतरी सांगता येत नाही. जवळपास २१ टन वजनाचे हे रॉकेट घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोसळू शकते.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते माइक हॉवर्ड यांच्या निवेदनानुसार, चीनी लाँग मार्च ५ बी रॉकेट हे अंतराळात गेल्यावर अनियंत्रित झाले आहे. आता हे चिनी रॉकेट अथवा त्याचे तुकडे लवकरच पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळणार आहेत. १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असलेले हे रॉकेट ४ मैल प्रति सेकंद अशा प्रचंड वेगाने पृथ्वीकडे येत आहे. अमेरिकन स्पेस कमांड या अनियंत्रित रॉकेटचा मागोवा घेत आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की हे रॉकेट अथवा त्याचे तुकडे कोठे कोसळणार हे निश्चित करणे अवघड आहे. काही तासांच्या अंतरावर असताना त्याची नेमकी दिशा कळू शकेल. ८ ते १० मे दरम्यान कधीतरी हे रॉकेट पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. त्या दोन दिवसांच्या कालावधीत ते ३० वेळा पृथ्वीभौती फिरेल. तोपर्यंत त्याचावेग ताशी १८ हजार मैल असेल. त्यामुळे त्याचा अंदाज लावण्यास एक तास लागला तर १८ हजार मैलाचा फरक पडेल. अमेरिकन शास्त्रज्ञांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.