अँटलिया स्फोटक प्रकऱणात मास्टरमाईंड एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

0
353

मुंबई, दि. १७ (पीसीबी) : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने शर्मांसोबत अटक केलेल्या दोघा आरोपींनी यासंदर्भात दावा केला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा सतीश आणि मनिष लोनी या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी सांगितलं. दरम्यान, शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.

एनआयएचा दावा काय?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी केला आहे.

हिरेनच्या हत्येनंतर आरोपी शर्मांच्या संपर्कात?
सतीश, मनीष, रियाझ काझी, सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन हत्येत सहभाग होता. सोबत संतोष शेलार आणि आनंद जाधव हेही होते. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेनच्या हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत. प्रदीप शर्मा हे निवृत्त आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्वर मिळाली आहे. ज्याच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे, असं वकिलांनी कोर्टात सांगितलं.

प्रदीप शर्मा काय म्हणतात?
दरम्यान, एनआयएने प्रदीप शर्मा यांचा यापूर्वीच जबाब नोंदवला होता. त्याच वेळी त्यांचे बँक डिटेल्स, सीडीआरही काढला होता. मात्र त्यात काहीही निष्पन्न न झाल्यामुळे त्यांना सोडलं होतं, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला.

1997 मध्ये मी शस्त्र विकत घेतलं आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माझा सहभाग असता, तर मी थांबलो असतो का? सचिन वाझे आणि माझा काहीही संबंध नाही. जे चार जण पकडले, त्यांना मी ओळखतही नाही. संतोष हा माझा जुना खबरी आहे. मी सेनेचा आहे, असं सांगताना प्रदीप शर्मा कोर्टात भावूक झाले. आतापर्यंत सचिन वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, प्रदीप शर्मा अशा आठ जणांना बेड्या पडल्या आहेत.