९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यात बंद नाही  

71

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाने  महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. मात्र, या बंदमधून मुंबई आणि ठाण्याला वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर  परळीलाही वगळण्यात आले आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर मराठा समनव्यक समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच नवी मुंबईतही कुठल्याही प्रकारचे आंदोलन करण्यात येणार नाही.  या चारही ठिकाणी फक्त ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांची आज (बुधवार) सकाळी एक बैठक  झाली. या बैठकीतील निर्णयानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच परळी या चार शहरांना उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगून  या एकमताने या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या शहरांमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा आंदोलन समन्वय समितीने घेतला आहे.

राज्यात गेल्या २१ दिवसांपासून ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागल्याचे दिसून आले. म्हणूनच उद्या ऑगस्ट क्रांती दिनी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मुख्य शहारांबरोबच महत्वाच्या जिह्ल्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर आणि रायगड आदी ठिकाणी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.