७० हजार कोटी खर्च करताना, अजितदादांनी वाटेल तसे पराक्रम केले- गिरीश महाजन

568

जळगाव, दि. ३० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जलसंपदामंत्री अजित पवार यांनी जलसंपदा खात्यात सत्तर हजार कोटी रुपये खर्च करताना, वाटेल तसे पराक्रम केले आहेत. ७० हजार कोटी रुपये खर्चूनदेखील एक टक्काही सिंचन न झाल्याने,त्यांच्या या पराक्रमामुळेच आम्हाला लोकांनी सत्ता दिली, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. जळगाव महापालिका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.

मागील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात कोणतेही टेंडर देताना त्यात पारदर्शता दिसत नव्हती. मंत्री सांगेल त्यालाच हे टेंडर दिले जायचे आणि त्यात जास्तीचे पैसे लावून महाराष्ट्राची लूटही केली जात होती. मात्र आमच्या काळात आम्ही जलसंपदा खात्यात पारदर्शता आणल्यामुळे, आमच्यावर कोणी एक शिंतोडाही उडवू शकला नाही, असे गिरीश महाजन यांनी नमूद केले.

जळगाव महापालिकेत भाजपाला सत्ता दिल्यास एकाच वर्षात जळगाव शहराचा विकास करुन, चेहरा- मोहरा बदलून टाकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतकेच नाही तर वर्षभरात जळगावचा कायापालट झाला नाही, तर विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्याकडे मत मागायला येणार नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.