४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी

80

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी विक्रम प्रस्थापित केला आहे. बांग्लादेश विरोधात किट्स येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये गेलने ५ षटकार ठोकून पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ६६ चेंडूमध्ये ७३ धावा चोपल्या. तसेच ५ षटकार ठोकून आफ्रिदीची बरोबरी केली.

आफ्रिदी आणि गेल या दोघांनीही आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये ४७६ षटकार मारले आहेत.  आफ्रिदीने हा विक्रम ५२४ सामन्यांत केला होता. तर गेलने केवळ ४४३ सामन्यामध्ये विक्रम केला आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडीजचा बांग्लादेशने २-१ असा पराभव केला. तरीही चर्चा बांग्लादेशच्या विजयाच्या नव्हे, तर गेलच्या खेळीच्या रंगल्या आहेत.

शाहिद आफ्रिदीने आपल्या एकूण ४७६ षटकारांपैकी ३५१ षटकार वनडे, ७३ सिक्स टी-२० आणि ५२ सिक्स कसोटी सामन्यांत लगावले आहेत. तर दुसरीकडे, गेलने ४७६ षटकारापैकी  २७५ षटकार वनडे, १०३ षटकार टी-२० आणि तब्बल ९८ षटकार कसोटी सामन्यांत ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप ५ खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आहे. त्याने ५०४ सामन्यांमध्ये आतापर्यंत ३४२ षटकार ठोकले. सर्वाधिक षटकार लावणाऱ्यांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. सोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २६४ षटकारांसह ९ व्या आणि २५१ षटकारांसह युवराज सिंह १२ व्या क्रमांकावर आहे.