३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे समजतंय – कुमारस्वामी

846

बंगळुरू, दि. २६ (पीसीबी) – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला, तर मी पुन्हा एकदा कर्नाटकचा मुख्यमंत्री होईल, असे विधान केले आहे. या विधानावर सध्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया देताना माझ्या काही मित्रांकडून ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे मला समजले आहे, असे  म्हटले आहे.

कुमारस्वामी म्हणाले की, पण मला त्याची चिंता नाही. मी किती काळ मुख्यमंत्री म्हणून राहील यापेक्षा, मी जे काम करत आहे, तेच माझे भविष्य ठरवेल. आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी कोणाचेही नाव न घेता केला . पण,  आमचे सरकार पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली होती. मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी विरोधकांनी हातमिळवणी केली होती. सध्या राजकारणात जात आणि पैशांचे महत्व वाढले आहे. पण राजकारण कायम बदलत असते. मी पुन्हा एकदा लोकांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री होईल,  असे सिद्धरामय्या म्हणाले होते.