२० एकरावरची ३३८ घरांची लेबर कॉलनी भुईसपाट

202

औरंगाबाद, दि. ११ (पीसीबी) : लेबर कॉलनीत आज सकाळीच ही पाडकामाची कारवाई सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे स्वतः उपस्थित आहेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तात घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. लेबर कॉलनी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. पाडकामामुळे काही नागरिक भावुक झाल्याचे दिसून आले. अनेकांना अश्रु अनावर झाले. नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला. यामुळे कारवाई अतिशय शांततेत सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. यावेळी एका कुटुंबातील सदस्यांनी पुनर्वसनाची मागणी केली.

औरंगाबादच्या लेबर कॉलनीत पाडकाम सुरू, जमावबंदी लागू; अनेकांना अश्रू अनावर
शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानजीक सुमारे २० एकरावर उभारण्यात आलेली व सुमारे ६५ वर्ष जुनी असलेली लेबर कॉलनीचा ताबा मिळविण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. इथे एकूण ३३८ सदनिका होत्या. लेबर कॉलनी पाडापाडी नियोजनाबाबत सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यास महापालिका, पोलिस प्रशासनासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कारवाईसाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. परिसरातील रस्ते बंद करणे, वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.

लेबर कॉलनी ही शासकीय मालकीची आहे. त्यावर नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच मंत्रीमंडळ बैठकीसाठी सभागृह, एक्झिबेशन सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २०१६ मध्येच ४० कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासनाचे अनेक कार्यालय शहरात विविध ठिकाणी किरायाच्या इमारतीत आहे. किरायापोटी वार्षिक सव्वा दोन कोटी रुपये खर्च होतो. ही सर्व कार्यालय लेबर कॉलनी परिसरात उभारण्याचेही नियोजन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.