२०१९ ची लोकसभा अमित शहा यांच्या नेतृत्वाखालीच भाजप लढविणार

120

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक एक वर्ष लांबणीवर  टाकण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षापर्यंत अमित शहा भाजपच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक अमित शहा यांच्या नेतृत्वाखालीच भाजप लढवणार आहे. नवी दिल्ली येथे आज (शनिवारी) झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  

अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपुष्टात येत आहे. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार होते. मात्र, भाजपाच्या आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकींमध्ये अमित शहा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आजपासून भाजपच्या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीसाठी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह राज्यांचे प्रदेशाध्यक्षही सहभागी झाले आहेत. यावेळी २०१९ मध्ये आम्ही स्पष्ट बहुमताने विजयी होऊ. आमच्या या संकल्पाला कोणीही धक्का लावू शकणार नाही.’ असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.